महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबईनजीक नालासोपारा इथे उघडकीस आली आहे. संतोष भवनच्या बावशेत पाडामधील एका चाळीतील घरात शुक्रवारी रात्रीच्या वेळी एकमेकांजवळ झोपलेल्या पती व पत्नीवर माथेफिरू हल्लेखोराने रात्रीच हल्ला चढवला आणि चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. आरोपीने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर, मानेवर आणि दंडावर तसेच अमितच्याही दंडावर सपासप वार केले आणि हल्लेखोर यानंतर पळून गेला.
उपलब्ध माहितीनुसार, बावशेतपाडा येथील चौबे चाळीत अमित मिश्रा (24) आणि त्याची पत्नी ज्योती मिश्रा हे दोघे राहतात. शुक्रवारी रात्री दोघेही घरी एकमेकांजवळ झोपलेले असताना एक अज्ञात माथेफिरू त्यांच्या घरात घुसला आणि त्याच्याकडील हत्याराने त्याने पत्नी ज्योती हिच्यासह तिच्या पतीवर देखील वार केले. जखमी अमितने आरोपीला विरोध केला त्यामुळे आरोपी एक चाकू घरातच टाकून तेथून पळून गेला .
अचानक हल्ला झाल्याने दाम्पत्याने जोरदार आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी मिश्रा यांच्या घराकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आरोपी माथेफिरूवर दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर दाम्पत्यावर झालेला हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. सदर आरोपी हा शुक्रवारी सकाळी त्या परिसरात दिसल्याचे व अमितच्या मोबाईलवर आरोपीने जीवे ठार मारण्याचा संदेश पाठवला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. नेमका हा आरोपी कोण आहे ? त्याने हा हल्ला का केला याचा पोलीस तपास करत आरोपीचा शोध घेत आहे.