शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून पुन्हा एकदा असाच प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे. कोयत्याने वाहनाची तोडफोड करत शिवीगाळ करून सराईत गुन्हेगार गंग्या वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी थेरगाव परिसरात गुरुवारी दहशत निर्माण केलेली आहे . तीन जणांना अटक करण्यात आलेली असून गणेशनगर येथे साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संदीप प्रभाकर कुलकर्णी ( वय 40 वर्ष राहणार मयुरेश्वर कॉलनी गणेश नगरवाकड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे ( वय 28 ) , असद गोलंदाज ( वय 20 दोघेही राहणार लोकमान्य कॉलनी थेरगाव ) आणि समाधान परिहार ( वय ३० राहणार लांडे वस्ती एमआयडीसी भोसरी ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे . इतर तीन मुलांवर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संदीप कुलकर्णी हे गुरुवारी रात्री घरासमोर शतपावली करत असताना तीन अल्पवयीन मुले तिथे आली आणि त्यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. फिर्यादी यांनी त्याला हटकले त्याचा अल्पवयीन मुलांना राग आला आणि त्यानंतर त्यांचे साथीदार देखील तिथे दाखल झाले.
त्यांनी संगनमत करून कुलकर्णी यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि ‘ आम्ही गंग्या भाईच्या गॅंगचे नंबरकारी आहोत. आम्हाला आमच्या नादी लागले तर तुम्हाला असेच फोडून टाकू ‘ असे म्हणत अल्पवयीन मुले आणि त्यांच्या साथीदारांनी धमकावले सोबतच हवेत कोयता फिरून दहशत निर्माण केली. तक्रारदार यांनी त्यानंतर पोलिसात धाव घेतली असून तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.