महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असे प्रकरण काही वर्षांपूर्वी पुण्यात समोर आलेले होते. घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये माहेरून घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला आणि त्यानंतर तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क तिचे डोके धडावेगळे करण्यात आले होते . महिलेचा पती आणि सासर्याला न्यायालयाने या प्रकरणी जन्मठेप तसेच प्रत्येकी 60000 रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे तर सासूला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दिपाली ढगे ( वय 24 ) असे मयत पत्नीचे नाव असून याप्रकरणी तिचा पती कांताराम सत्यवान ढगे ( वय 27 ) , सासरा सत्यवान बबन ढगे ( वय 57 ) अशी जन्मठेप सुनावण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत तर 40 वर्षीय सासूला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे . 2013 मध्ये ही घटना घडलेली होती.
आरोपी व्यक्ती यांनी दिपाली हिच्याकडे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये अशा स्वरूपात तिचा छळ सुरू केला नाहीतर तुझ्या आई-वडिलांना आपल्याला घर बांधून द्यायला सांग असे ते म्हणू लागले . दिपाली हिने माझी माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशी वेळोवेळी विनंती केली मात्र आरोपींनी सतत तिचा छळ सुरू केला आणि अखेर तिचा खून केला आणि तिचा मृतदेह अज्ञातस्थळी मुंडके कापून फेकून दिलेला होता.
सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले आणि पंधरा साक्षीदार तपासले . गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याकारणाने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी एडवोकेट पाठक यांनी केली आणि न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना शिक्षा सुनावलेली आहे . पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांनी या प्रकरणाचा तपास केलेला आहे.