पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून समोर रहायला असलेल्या महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीकडून तब्बल आठ लाख 39 हजार रुपयांची खंडणी उकळलेली आहे . पुन्हा तिने दहा लाख रुपयांची मागणी केलेली होती मात्र पीडित व्यक्तीने नकार दिला आणि अखेर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी पती पत्नीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 11 ऑगस्ट 2022 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत हा प्रकार वेळोवेळी घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गणेश माने ( वय 38 राहणार आंबेगाव खुर्द ) असे तक्रारदार यांचे नाव असून आरोपी महिला आणि तिचा दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित महिलेने देखील तक्रारदार व्यक्ती यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी व्यक्ती हे एक व्यावसायिक असून पुण्यामध्ये त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे. त्यांच्या फ्लॅटच्या समोरच आरोपी महिला राहत असून तिने स्वतःहून फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवली आणि त्यानंतर त्यांना घरी बोलावून घेतले. आरोपी महिलेने त्यांना शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली आणि त्यानंतर त्याचे फोटो देखील फिर्यादींना काढण्यास भाग पाडले . आरोपी महिलेने त्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी सुरू केली.
व्यावसायिक यांनी तिला अनेकदा झाले गेले विसरून जाण्याचा सल्ला दिला मात्र तिने बलात्काराची धमकी दिली त्यानंतर महिलेचा दाजी तेजेंद्र त्रिपाठी याने प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलमधील फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आणि त्यानंतर आरोपी महिला , तिचा पती आणि दाजी त्रिपाठी यांनी तिघांनीही पैशासाठी त्रास देण्यास सुरू केले.
आरोपी महिलेने गेल्या वर्षभरात फिर्यादी यांच्याकडून आठ लाख 39 हजार रुपये उकळले तरी देखील तिचे समाधान झाले नाही म्हणून तिने आणखीन दहा लाख रुपयांची मागणी केली. आपण कितीही पैसे दिले तरी समोरील महिलेची पैशाची भूक भागत नाही हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे.आरोपी महिलेने देखील फिर्यादी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला असून आपले फोटो आपल्या दाजीला गणेश यांनी पाठवले असे देखील तिचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.