फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या नागपूर इथे समोर आलेला असून युट्युबवरील व्हिडिओला लाईक करून त्याचे स्क्रीन शॉट पाठवा आणि पैसे कमवा असे सांगत एका उच्चशिक्षित नोकरदाराला सायबर भामट्यांनी तब्बल 77 लाख रुपयांना गंडा घातलेला आहे . तक्रारदार व्यक्ती हे वेकोलीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते.
उपलब्ध माहितीनुसार , सरी कोंडा राजू ( वय 56 राहणार संदेश सिटी जामठा हिंगना ) असे उच्चशिक्षित व्यक्तीचे नाव असून 26 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवण्यात आली होती त्यामध्ये युट्युब व्हिडिओला लाईक करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा . प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला पन्नास रुपये देऊ असे सांगण्यात आले . रिकाम्या वेळेत लाईक करण्याचेच काम आहे त्याचे पैसे मिळणार आहेत म्हटल्यानंतर या व्यक्तीने व्हिडिओला लाईक केले आणि स्क्रीन शॉट पाठवून दिला.
अशाच पद्धतीने त्यांना काही काळ रक्कम मिळत गेली त्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितली . पैसे मिळणार म्हणून आपल्या बँकेचे पासवर्ड आणि बँक खात्याची संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगाराला त्यांनी दिली त्यानंतर त्यांनी काही काळ आरोपींनी दिलेले टास्क पूर्ण केले याच दरम्यान 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर च्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 77 लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केलेले आहेत. सदर प्रकरणी सायबर पोलीस सध्या तपास करत आहेत.