महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना भिवंडी इथे उघडकीस आली असून एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून चक्क मटण कापणाच्या सुऱ्याने आपल्या पत्नीवर वार केले त्यात तिचा मृत्यू झाला आहे. आपल्याकडून झालेल्या चुकीची त्याला जाणीव झाल्याने त्याने तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पाण्यात उडी घेऊन वाचवले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान आहे. त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे. गेल्या काही महिन्यांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांची ह्याच कारणावरून सातत्याने भांडणे होत होती. रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले तेव्हा आनंद याने अचानक चिडून जाऊन पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून पत्नी मीना हिच्या गळ्यावर पोटावर सपासप वार केले आणि स्वतः देखील जवळ असलेल्या तलावात जाऊन उडी घेतली.
तलावात त्याने उडी घेतल्याचे पाहताच काही नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी उड्या मारून त्याला बाहेर काढले तर काहींनी त्याच्या पत्नीला दवाखान्यात ऍडमिट केले मात्र उपचार सुरू असताना पत्नी मीना हीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंद यास ताब्यात घेत अटक केले आहे.