महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना जालन्यात समोर आलेली असून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा होत नसल्याकारणाने मंठा तालुक्यातील पाटोदा येथील एका शेतकऱ्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास विष प्राशन केलेले आहे.
अनेकदा तक्रार देऊन देखील सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडत नसल्याने त्यांनी अखेर हा प्रयत्न केलेला असून भगवान नागोराव काळे असे शेतकऱ्याचे नाव आहे. एका सावकाराकडून त्यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते आणि त्या बदल्यात शेतकऱ्याला जमीन लिहून दिलेली होती. सावकाराला त्यांनी पैसे देखील परत केले मात्र दरम्यानच्या काळात सावकाराने स्वतःच्या नावावर जमीन करून टाकली.
काळे यांनी अनेकदा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली मात्र तक्रारीचा निपटारा होत नसल्याकारणाने गुरुवारी सकाळी ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले आणि त्यांनी माझ्या तक्रारीचा निपटारा तुम्ही का केला नाही ? असे म्हणत विषारी द्रव प्राशन केला. कार्यालयीन शिपाई कल्याण लांडगे यांनी त्यांच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेतली. शेतकऱ्यावरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.