लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या पुण्यात समोर आलेला असून एक पोलीस उपनिरीक्षक आणि चक्क व्यवसायाने वकील असलेल्या व्यक्तीला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाअंतर्गत ताब्यात घेण्यात आलेले आहे. भिगवन पोलीस स्टेशन इथे ही कारवाई करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती यांच्या वडिलांचे जून 2023 मध्ये अपघाती निधन झालेले असून या प्रकरणाचा तपास भिगवन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे ( वय 52 ) यांच्याकडे होता. तक्रारदार यांच्या वडिलांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्स कागदपत्रे आणि दाखल गुन्ह्यातील कागदपत्रे देण्यासाठी लोकसेवक प्रवीण लोकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती .
तक्रारदार यांच्यासोबत असलेले वकील मधुकर विठ्ठल कोरडे यांनी देखील लोकसेवक प्रवीण लोकरे यांना पैसे द्यावे लागतील त्याशिवाय काम होणार नाही असे सांगितलेले होते. हतबल तक्रारदार यांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क करून तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर प्रवीण लोकरे यांनी पंचांच्या समक्ष तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आणि तडजोडीनंतर वीस हजार रुपयांवर त्यांचा व्यवहार देखील ठरलेला होता .
लोकसेवक प्रवीण लोकरे यांच्याकरता खाजगी इसम असलेला वकील मधुकर विठ्ठल कोरडे ( वय 34 ) याने तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आणि लोकसेवक याच्या लाचखोरीला प्रोत्साहन दिले म्हणून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.