नववधूच्या हातचा चहा पिणे पडले महागात, घडली जन्माची अद्दल

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशात फिरोजाबाद इथे उघडकीस आली आहे . लग्नासाठी अवघे काही तास बाकी राहिलेले असताना एका चलाख नवरीने चक्क आपल्या कुटुंबियांना अंधारात ठेवत पलायन केले. धक्कादायक बाब म्हणजे तिने आधी सर्व जणांना चहामधून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर दागीने घेऊन पळ काढला. तिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करायचे होते म्हणून तिने हा सर्व प्रकार केल्याचे समजते .

नववधू पळून गेल्यावर तिच्या बहिणीने सांगितले की, तिचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते म्हणून ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. मुलीने पळून जाण्यापूर्वी चहामध्ये काही नशेचे पदार्थ मिसळले होते त्यामुळे नशेचा चहा प्यायल्याने कुटुंबातील 6 जण बेशुद्ध झाले. बेशुद्ध झालेल्या लोकांना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून पळून गेलेल्या मुलीचा शोध घेण्यात येत आहे .

सदर तरुणीचे शेजारी यांना देखील या मुलीचे लग्न तिच्या मर्जीशिवाय लावले जात असल्याची कल्पना होती. शुक्रवारी रात्री घरात महिलांचा गाण्याचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यावर सर्व शेजारी निघून गेल्यावर नववधूने घरातील सदस्यांना चहा दिला. नववधूने गोड बोलून दिलेला चहा पिणे या मंडळींना चांगलेच महागात पडले. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा सगळे रुग्णालयात होते. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

वधू घरातून पळून गेल्यानंतर आधी तिचा शोध घेण्यात आला मात्र ती न सापडल्यामुळे तिच्या लहान बहिणीसोबत वराचे लग्न लावण्यात आले. तसेच या प्रकरणी तरुणीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


Spread the love