महाराष्ट्रात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आलेला असून औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावातील जलजीवन मिशनचे काम हस्तांतरित करून घेणे तसेच नळ जोडणीसाठी आदेश देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सूर्यकांत खाडे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून पूर येथील जलजीवन मिशनचे काम मंजूर झाल्यानंतर त्यासाठी 51 लाख रुपये निधीदेखील मंजूर झालेला होता. 44 लाख रुपये खर्चून काम पूर्ण करण्यात आले त्यानंतर सध्या झालेले काम हस्तांतरित करून नळ जोडणीचे आदेश देण्यासाठी ग्रामसेवक याने कंत्राटदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागीतलेली होती.
तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबर वर फोन केला सोबतच हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क केला. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे ग्रामसेवकाला लाच देण्यासाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी हे शिरड शहापूर येथे आलेले होते.
आरोपी खाडे देखील तिथे पोहोचला आणि पैसे घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कुरुंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अनिल कटके व पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर , जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे , तानाजी मुंडे , भगवान मंडलिक यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.