रोजच्या कामाचा भाग म्हणून जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कारवाई करत असतात मात्र जर पोलिसांनीच जुगार खेळायला सुरू केले आणि ते देखील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तर कसे ? मात्र हा प्रकार घडलेला आहे . बिनधास्तपणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका खोलीत जुगार खेळणाऱ्या सात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , परभणी येथील हा प्रकार असून परभणीचे पोलीस आयुक्त रागसुधा आर यांनी ही कारवाई केलेली असून नवा मोंढा पोलीस ठाण्यात सात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील बाजूला चालक आणि राखीव कर्मचाऱ्यांसाठी एक खोली आहे. या खोलीत पोलीस कर्मचारी आराम करतात किंवा कपडे बदलतात . सात ते दहा कर्मचारी सतत तिथे राहतात याच दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी तिथेच तिरटचा डाव मांडलेला होता.
पोलीस अधीक्षक कार्यालयात हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी तिथे जाऊन पाहणी केली त्यावेळी सात कर्मचारी त्यांना तिथे आढळून आलेले होते. सदर कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्याचे आदेश अधीक्षक यांनी दिलेले असून सदर कर्मचाऱ्यांकडून 5900 रुपयासोबत जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. प्रवीण राठोड , मुंजाजी जामगे , विशाल ठाकूर , शेख मुख्तार , बालाजी रनेर, विजय लांडगे , शेख रशीद अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.