शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोज समोर येत असून पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी इथे सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. इंदापूर पोलिसात सासू-सासरा आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , सीमा सदाशिव निकम असे मयत विवाहित महिलेचे नाव असून सासरा महादेव रामचंद्र निकम , सासू संपदा महादेव निकम , दीर गोविंद महादेव निकम ( सर्वजण राहणार बोराटवाडी तालुका इंदापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सासरा आणि सासू यांना पोलिसांनी अटक केलेली असून गोविंद हा अद्यापपर्यंत फरार आहे. सीमाच्या वडिलांनी याप्रकरणी बावडा पोलीस दुरक्षेत्रात फिर्याद दिलेली आहे.
सीमा यांच्या पतीचा इंदापूर परिसरात अपघात झाला होता त्यानंतर ते 70 टक्के अपंग झाल्यानंतर अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या वाटणीची जमीन सीमा कसत होती ती तिने कसू नये आणि मुलांना घेऊन माहेरी निघून जावे यासाठी सासरा सासू आणि दिर यांनी तिचा छळ सुरू केलेला होता.
सर्व आरोपींनी त्यांना ‘ तू इथे राहू नको विष घेऊन कुठेतरी मर नाहीतर मुलांना घेऊन कुठेतरी जा ‘ असे म्हणत छळले आणि अखेर हतबल झालेल्या सीमा यांनी घरातील तणनाशक औषध प्राशन केले त्यानंतर त्यांना अकलूजच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला. बावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कारवाई करत मयत व्यक्तीच्या सासू-सासर्याला ताब्यात घेतलेले असून दिराचा देखील शोध सुरू आहे.