पुणे शहरातील पिंपरी इथे तृतीयपंथीय व्यक्तींकडून हप्ता घेणाऱ्या पाच जणांच्या टोळीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केलेली आहे. तळेगाव इथे मागील दहा ते अकरा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तृतीयपंथीय व्यक्तींना जर तुम्हाला या परिसरात भीक मागायची असेल तर आम्हाला हप्ता द्यावे लागेल असे सांगत सव्वा लाख रुपये हप्त्याची मागणी त्यांनी केलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , नंदकिशोर उर्फ नंदिनी ज्ञानेश्वर भेडेकर ( वय 30 राहणार वालेकर वाडी ) असे फिर्यादी यांचे नाव असून त्यानंतर पोलिसांनी प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेंडे( वय 27 ), अजय महादेव भंडलकर ( वय 23 ), अमित मुरलीधर पवार ( वय 28 ) आकाश विजय कुडाळकर ( वय वीस ), निशान वसंतराज गायकवाड ( वय 28 सर्वजण राहणार तळेगाव दाभाडे ) यांना अटक केलेली आहे.
फिर्यादी व्यक्ती हे तृतीयपंथी असून ते आणि त्यांच्या चार मैत्रिणी तळेगावजवळील कॅम्प रोड परिसरात भीक मागतात. आरोपींनी जानेवारी 2023 मध्ये त्यांना हटकले आणि रोडच्या कडेला थांबल्याबद्दल शिवीगाळ केली . इथे उभे राहून जर भिक मागायची असेल तर आम्हाला हप्ता दिला पाहिजे असे म्हणत त्यांना धमकी दिली आणि आरोपींनी त्यांच्याकडून जानेवारी 2023 पासून तर नोव्हेंबर 2023 पर्यंत सुमारे एक लाख बारा हजार रुपये हप्ता देखील घेतला असे फिर्यादींचे म्हणणे आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांना वेळोवेळी पैसे दिलेले असून आरोपींनी ही रक्कम कधी रोख तर कधी ऑनलाईन स्वरूपात स्वीकारलेली आहे . रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फिर्याद्री दिलेली असून पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करत तपासाला सुरुवात केलेली आहे