‘ फराळ नको भाकरी करून दे ‘ , लाडक्या दिवट्याने घेतला आजीचा जीव

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून बीड जिल्ह्यात ‘ मी एकादशीचा फराळ खाणार नाही भाकरी करून दे ‘ यावरून वाद घालत एका तीस वर्षाच्या लाडक्या दिवट्याने स्वतःच्या आजीचा खून केलेला आहे. बीड जिल्ह्यातील लोणगाव येथील ही घटना असून दिंद्रुड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कौशल्याबाई किसनराव राऊत ( वय 82 वर्ष ) असे या दुर्दैवी आजींचे नाव असून त्या त्यांचा मुलगा बाळासाहेब किसनराव राऊत ( वय 56 वर्ष ) आणि राहुल बाळासाहेब राऊत ( वय तीस वर्ष ) यांच्यासोबत लोणगाव इथे राहत होत्या. कार्तिकी एकादशीनिमित्त उपवास असल्याकारणाने त्यांनी सर्वांसाठी फराळ केलेला होता मात्र आरोपीने मला फराळ नको भाकरी करून दे असे म्हणत त्यांच्यासोबत वाद घातला.

वादाला सुरुवात झाल्यानंतर आरोपीने दगड आणि काठीने आजीला बेदम मारहाण केली त्यामध्ये आजींचा मृत्यू झालेला आहे. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केलेला असून माजलगाव ग्रामीण रुग्णालयात अखेर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. कौशल्याबाई यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव घोडेवाड पुढील तपास करत आहेत.


Spread the love