महाराष्ट्रात खंडणीखोरीचा एक अद्भुत प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे समोर आलेला असून ‘ वुशू खेळाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करून शासनाची दिशाभूल करतात म्हणून तुमच्या विरोधात तक्रार करू आणि तुमची बदनामी करू ‘, अशी धमकी एका क्रीडा प्रशिक्षकाला देत चक्क दोन शिष्यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली होती. छत्रपती संभाजीनगर परिसरातील सातारा पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अर्जुन उत्तम पवार आणि योगेश नामदेव जाधव अशी आरोपींची नावे असून क्रीडा शिक्षक असलेले महेश कृष्णा इंदापुरे ( राहणार विटखेडा ) यांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे . आरोपींनी त्यांच्याकडे वुशू खेळाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले होते त्यानंतर त्यांची जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी देखील निवड झाली.
दरम्यानच्या काळात दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांचा पेन ड्राइव चोरून नेला आणि त्यानंतर व्हाट्सअपवर कॉल करून ‘ तुमचे सगळे धंदे आम्हाला माहिती आहेत अडीच लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला बदनाम करू ‘ अशी धमकी दिली. योगेश याने अडीच लाख रुपये देऊन विषय इथेच संपवून टाका असे देखील सांगितले आणि हा सर्व प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये देखील रेकॉर्ड केला. सदर प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहे.