शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून कॅम्प परिसरातील सेंटर स्ट्रीट रस्त्यावर एका कापड व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. सदर व्यवसायिक या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले असून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विजय विमलचंद मेहता ( वय 38 राहणार युनिव्हर्सल अपार्टमेंट पुणे कॅम्प ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे सेंटर स्ट्रीट रोडवर स्टेप इन नावाचे कपड्याचे दुकान आहे. रात्री सव्वा नऊच्या सुमारास दोन अज्ञात तरुण तिथे घुसले आणि त्यांनी विजय यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. विजय जागीच कोसळले त्यानंतर आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती समजल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले असून आरोपी हे भोपळे चौक परिसरातून आल्याची प्राथमिक माहिती आहे . विजय यांची प्रकृती सुधारल्यानंतर जबाब घेतल्यावर आणखीन माहिती समोर येण्याचा अंदाज आहे.