महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना जळगाव इथे उघडकीस आली होती.पैशाचा पाऊस पडेल यासाठी जादूटोणा करुन एका तरुणाने मांत्रिकाची मदत घेत चक्क आपल्या मामीला फसवून नेले आणि तिला खून केला .मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी चेहरा देखील जाळला होता. शहरी भागात ही घटना समोर आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली होती. माया दिलीप फसरे (वय ५१, रा. क्रांती चौक, शिवाजीनगर) असं मृत महिलेचं नाव असून अमोल रतनसिंग दांडगे (वय २७ रा. शिवाजी नगर ) असे या मामीच्या भाच्याचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (वय २२, रा. शिवाजीनगर) याने जादूटोणा करुन पैसे मिळवून देण्याचे आमिष भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय २७ रा. शिवाजी नगर ) याला दाखवले मात्र त्यासाठी एक बळी द्यावा लागेल असे सांगितले आणि त्यानंतर अमोल याने आपली मामी माया फरसे यांना विश्वासात घेत नदीकाठी पूजा करायची आहे असे सांगत १५ डिसेंबर रोजी मामीला सोबत घेऊन तापी नदीकाठी गेला.
मांत्रिक संतोष आणि भाचा अमोल या दोघांनी काही वेळ पूजापाठ केल्यानंतर दोरीच्या साहाय्याने मामी माया फरसे यांचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला आणि उरलेला मृतदेह हा तिथेच पुरून दोघे जळगाव इथे निघून आले. माया या घरी परत न आल्याने त्यांचे पती दिलीप रुपचंद फरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली अन तपास सुरु झाला.
पती दिलीप फरसे यांनी भाचा अमोल याच्यावर संशय देखील व्यक्त केला त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही पाहण्यात आले आणि त्यात अमोल हाच मामीला घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. जादूटोणा करण्यासाठी बळी म्हणून मामीचा खून केल्याची माहिती अमोलने दिली आणि मांत्रिक असलेला संतोष याचेही नाव सांगितल्याने पोलिसांनी त्यांना सोबत घेत नदीकाठ गाठला आणि माया फरसे यांचा मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार जादूटोण्याच्या कारणावरुन खून केल्याची माहिती आहे मात्र सदर गुन्ह्यात इतरही काही अँगल आहे का ? याची चौकशी पोलीस करत असून घटनास्थळी हळद, कुंकू असे पूजेचे साहित्यही आढळून आलं आहे तर अमोल व संतोष या दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.