महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून अनैतिक संबंधातून नात्यातील एका महिलेला त्रास दिल्यानंतर मुंबई येथील एका व्यावसायिकाचा खून करून त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटातील मुळशी तालुक्यातील गोणवडी गावाजवळ फेकून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे . खंडणीविरोधी पथकाने खेडशिवापूर परिसरातून संशयित आरोपींना अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ज्यो मॅन्युअल परेरा ( राहणार कलिना मुंबई ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणात अशोक महादेव थोरात ( वय 35 एनडीए रस्ता वारजे ), गणेश साहेबराव रहाटे ( राहणार अप्पर इंदिरानगर बिवबेवाडी ), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंखे ( वय 40 राहणार हरकानगर भवानी पेठ ) आणि योगेश दत्तू माने ( वय 40 राहणार वारजे माळवाडी ) यांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपींपैकी योगेश दत्तू माने हा महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी असून दुसरा आरोपी साळुंखे हा सराईत गुन्हेगार आहे . ज्यो परेरा यांचा मच्छी विक्रीचा व्यवसाय होता आणि मुख्य आरोपी असलेला योगेश माने याच्या नात्यातील एका महिलेसोबत ते एकत्र राहत होते . परेरा यांच्या सोबत भांडण झाल्याची माहिती महिलेने माने याला दिली त्यानंतर २० डिसेंबर 2023 रोजी माने हा त्याच्या साथीदारांसोबत मुंबईला देखील गेला.
मुंबईला गेल्यानंतर माने आणि परेरा यांच्यात भांडण झाले त्यानंतर आरोपी योगेश माने आणि त्याच्या साथीदारांनी परेरा याच्यावर वार केले त्यात त्यांचा मृत्यू झाला . खून झाल्याचे समजल्यानंतर मुंबईत मृतदेह टाकून दिला तर पोलीस पकडतील म्हणून त्यांनी परेरा यांचा मृतदेह गाडी टाकला आणि त्यानंतर ताम्हिणी घाट परिसरात फेकून दिला.
आरोपी सर्व आरोपी हे गोव्याला फरार होण्याच्या तयारीत होते मात्र पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना खेडशिवापूर परिसरात ताब्यात घेतले . गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे . सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर उपनिरीक्षक मोहनदास जाधव श्रीकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.