पुण्यामध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील आंबवणे परिसरात घडलेला आहे . विंजर गावाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपीएमएल बस चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या काही मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केलेली असून या प्रकरणात चालक जखमी झालेला आहे. बुधवारी हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तेजस चंद्रकांत गायकवाड ( वय 35 वर्ष ) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तर एकाला अटक करण्यात आलेली असून दुसरा आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे . निलेश पंढरीनाथ सरपाले ( वय 26 वर्ष ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून श्रेयस काळूराम सरपाले हा अद्यापपर्यंत फरार आहे.
वेल्हे तालुक्यातील विंजर गावाकडून पुण्याच्या दिशेने फिर्यादी व्यक्ती हे बस घेऊन चाललेले होते त्यावेळी बसच्या पुढे आरोपी चार चाकी गाडीतून चाललेले होते. बस चालक यांनी हॉर्न वाजवत त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले मात्र चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याकारणाने त्याने हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरत फिर्यादी यास मारहाण केली. आरोपी व्यक्तींनी बियरची बाटली उचलून गाडीच्या टायरवर फोडली आणि चालकाच्या केबिनचा दरवाजा उघडत चालकाला बेदम मारहाण केली.
चालक तेजस गायकवाड यांच्या उजव्या कानाला गंभीर दुखापत झालेली असून प्रवाशांनी आरडाओरडा केला त्यानंतर आरोपी फरार झाले . पुण्यामध्ये पीएमपीएमएल बस चालक हे धनदांडग्या व्यक्तींच्या मुजोरीची शिकार होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.