महाराष्ट्रात सध्या फसवणुकीचे आणि लुटमारीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत असून असाच एक प्रकार सध्या मुंबईत समोर आलेला आहे . एका अनोळखी तरुणीला लिफ्ट देणे आणि त्यानंतर तिच्या सोबत कबाब खायला जाणे एका 33 वर्षाच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडलेले असून तरुणीने तिच्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा मोबाईल आणि दुचाकी देखील घेऊन पलायन केलेले आहे . वांद्रे पोलिसात दोन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फैयाज हुसेन असे फसवणुकीची शिकार ठरलेल्या व्यक्तीचे नाव असून वांद्रे कोर्ट परिसरात शाहीन असे एका मुलीने स्वतःचे नाव सांगितले आणि त्यांना कुर्ल्यापर्यंत लिफ्ट मागितली . शाहीन हिने ओळख झाल्यानंतर १८ डिसेंबर रोजी हुसेन यांना तीन वेळा फोन केला आणि रात्री वांद्रे तलाव इथे भेटायला येण्यास सांगितले.
हुसेन तिथे गेले त्यानंतर शाहीन ही एका महिलेसोबत तिथे आली आणि तिघेजण हुसेनच्या दुचाकीवरून कबाब कॉर्नरकडे गेले . शाहीन हिने हुसेन यांचा मोबाईल आणि दुचाकीची चावी घेतली आणि हुसेन याला कबाब घेऊन ये असे सांगितले . हुसेन यांची पाठ फिरताच दुचाकीवर बुरखाधारी महिला आणि शाहीन बसले आणि आम्ही मेडिकलमध्ये जाऊन आलो असे म्हणत दोघीही तिथून फरार झाल्या . हुसेन यांनी बराच काळ त्यांची वाट पाहिली मात्र त्या आल्या नाहीत म्हणून अखेर पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवलेला आहे.