‘ बारा कोयते ‘ देतो म्हणत पाच लाखांना फसवलं , मुकादम फरार 

Spread the love

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या सोलापूर मध्ये समोर आलेला असून तुम्हाला ऊस तोडणी साठी मजूर पुरवतो असे सांगत एका मुकादमाने ट्रॅक्टर मालकाला तब्बल पाच लाख रुपयांना गंडा घातला आहे. टेंभुर्णी पोलिसात या प्रकरणी आरोपी मुकादम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सलीम पावरा ( राहणार आंबा पाणी तालुका यावल जिल्हा जळगाव ) असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सोमनाथ रत्नाकर निर्धार ( राहणार मिटकलवाडी तालुका माढा ) यांनी फिर्याद दिलेली आहे. 

सोमनाथ यांचा शेती आणि ऊस वाहतूक करण्याचा व्यवसाय असून मागील दहा वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोपी सलीम याने तुम्हाला बारा कोयते म्हणजे 24 ऊसतोड मजूर देतो असे म्हणत लेखी करार करून दिला आणि त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले त्यातील केवळ चार कोयते म्हणजे आठ मजूर घेऊन तो स्वतः आला आणि उरलेले मजूर येत आहेत असे सांगत फिर्यादी यांची दिशाभूल करत राहिला. 

एका सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोड करत या आठ ऊसतोड मजुरांनी एक लाख रुपयांचे काम केले आणि त्यानंतर दहा डिसेंबर रोजी स्वतः सलीम पावरा हा ऊस तोडणी मजुरांना सोबत घेऊन निघून गेला. फिर्यादी यांचे घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून त्यांनी टेंभुर्णी पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 


Spread the love