महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हनी ट्रॅप प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत असून असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आलेला आहे . कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका 34 वर्षाच्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर त्याचे अश्लील व्हिडिओ युट्युब वर अपलोड करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल 43 लाख 22 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली . नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली असून गुन्ह्यात सहभागी इतर व्यक्तींचा देखील पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , हलीम फरीद खान ( वय 19 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका महिलेने कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या एका 34 वर्षीय व्यक्तीसोबत फेसबुकवर मैत्री केली आणि त्यानंतर अश्लील संभाषण करत त्याला आपल्या जाळ्यात ओढलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे महिला स्वतः विवस्त्र झाली आणि तक्रारदार व्यक्ती याला देखील कॅमेऱ्यासमोर विवस्त्र होण्यास भाग पाडले होते.
आरोपींनी त्यानंतर फिर्यादी व्यक्ती यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते व्हिडिओ युट्युब वर अपलोड करण्याची धमकी देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील धमकी दिली. फिर्यादी व्यक्ती त्यानंतर घाबरून गेले आणि आरोपींनी त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. नवी मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम , पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर , पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे आणि महिला पथकाने बँक खात्याचे विश्लेषण करत आरोपीची तांत्रिक माहिती मिळवली आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने हलीम फरीद खान याला राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवर असलेल्या एका दुर्गम गावातून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन , विविध कंपन्यांचे सिमकार्ड , बँकांचे एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केलेले आहेत. ज्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले होते ती खाती गोठवण्यासाठी तात्काळ पत्र व्यवहार करण्यात आला आणि चार लाख 12 हजार रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आलेले आहे. आरोपी व्यक्ती हा संघटितपणे हा प्रकार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतरही आरोपींसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केलेली आहे.