महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण नागपुरातील कामठी परिसरात समोर आलेले असून घरगुती भांडण विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केलेला आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवडी इथे रविवारी सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडलेली आहे. खून केल्यानंतर पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस तपासात तिचे बिंग फुटलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आनंद भदूजी पाटील ( वय 45 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो त्याची पत्नी अरुणा पाटील हिच्या सोबत राहत होता. त्यांना पाच वर्षाचा एक मुलगा असून आनंद मातीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते आणि त्यांच्या पत्नीत रोज भांडणे होत होती.
शनिवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले आणि भांडण विकोपाला गेल्यानंतर पहाटे पाच वाजता आनंद झोपेत असताना पत्नीने त्यांच्या डोक्यात दगडाने वार केले त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अरुणा हिने त्यानंतर घराला कुलूप लावले आणि निघून गेली . रविवारी संध्याकाळी चार वाजता पोलिसात त्यांनी पती हरवल्याची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे.