पुण्यातील कुख्यात गँगस्टर असलेला शरद मोहोळ याची भर दिवसा पुण्यात हत्या करण्यात आलेली असून त्याच्यावर काल चार गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या . त्याला सुरुवातीला सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि नंतर ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे . स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल नऊ पथके आरोपींचा शोध घेत होती आणि विक्रमी वेळेत पोलिसांनी आठ आरोपींना अटकही केलेली आहे.
पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि पोलिसांनी त्यानंतर आठ आरोपी , तीन पिस्तल , तीन मॅक्झिन आणि पाच राऊंड तसेच दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत . संपूर्ण पुणे जिल्ह्यात या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेतील मुख्य मास्टरमाइंड नामदेव कानगुडे उर्फ मामा याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याने नियोजनबद्ध पद्धतीने मुन्ना पोळेकर याच्यासोबत इतर दोन जणांना शरद मोहोळ टोळीत घुसवलेले होते. त्यानंतर ही हत्या करण्यात आलेली असून पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोहोळ याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत . पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे .
शरद मोहोळ याने येरवडा कारागृहात त्याचा साथीदार विवेक भालेराव याच्या मदतीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असलेला कातिल सिद्दिकी याचा खून केलेला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला मात्र बाहेर आल्यानंतर देखील त्याची अशा स्वरूपाची कृत्ये सुरूच होती . जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून शरद मोहोळ याला सहा महिन्यांसाठी तडीपार देखील करण्यात आलेले होते .