महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून अवघ्या बारा वर्षीय मुलीचा विवाह तिच्यापेक्षा दुपटीने जास्त वय असलेल्या म्हणजे सुमारे 29 वर्ष वय असलेल्या व्यक्तीसोबत लावून देण्याचा प्रकार पनवेल इथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असून खांदेश्वर पोलिसात या प्रकरणी बालविवाह करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलगी ही सातारा जिल्ह्यात पतीसोबत राहत होती.
उपलब्ध माहितीनुसार , आज रोजी तिचे वय बारा वर्षे नऊ महिने असून तिचे आई-वडील नवीन पनवेल इथे रहायला आहेत . नवीन पनवेल भागात सर्वेक्षण सुरू असताना अवघ्या बारा वर्षांची पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टरांनी या प्रकाराची माहिती खांदेश्वर पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या आई-वडिलांकडे चौकशीला सुरुवात केली.
पीडित मुलीच्या आई-वडिलांची सातारा जिल्ह्यातील खटाव येथील रणसिंगवाडी भागात राहणाऱ्या कुटुंबासोबत ओळख झाली अन त्यानंतर 29 वर्षाच्या व्यक्तीसोबत अवघ्या बारा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून देण्यात आलेला होता.
आरोपीने त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यातून तिला दिवस गेले . दिवस गेल्यानंतर बाळंतपणासाठी तिला नवीन पनवेल येथे आई-वडिलांच्या घरी आणण्यात आलेले होते. डॉक्टरांनी स्वतः फिर्यादी होऊन या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. पीडित मुलीसोबत बालविवाह करणाऱ्या आरोपीच्या विरोधात बलात्कार पोक्सो तसेच बालविवाह अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .