महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून निरमा पावडर विकण्याच्या बहाण्याने 30 ते 35 वर्षे वयोगटातील दोन तरुणांनी एका महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावर पोबारा केलेला आहे . भिगवण येथील ही घटना असून महिलेने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुलोचना विकास दराडे ( वय 22 वर्ष राहणार अकोले ) या 29 तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास अकोले येथे घराबाहेर असताना 30 ते 35 वयोगटातील दोन अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी तुम्हाला निरमा पावडर विकत घ्यायची आहे का ? अशी विचारणा केली.
आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले . पाणी आणण्यासाठी त्या वळाल्या त्यावेळी काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून आलेल्या व्यक्तीने दमदाटी करत त्यांच्या डाव्या कानातील सोन्याचे दागिने आणि त्यावरील सोन्याचे वेल तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून तिथून पलायन केले. भिगवन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.