मुंबई आणि परिसरातील म्हणजेच मुंबई महानगर भागातील भविष्यातील वाहतुकीच्या आराखड्याबाबत एका कार्यशाळेचे आयोजन एमएमआरडीएने म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी केले होते. मुंबई महानगर भागातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे घटलेले प्रमाण यावर अभ्यासासाठी म्हणून हा कार्यक्रम होता.सार्वजनिक वाहतुक व्यवस्था भक्कम करण्याकडे पावलं उचलली जात असल्याचं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना केंद्र सरकारवर मिश्किल भाषेत टीका केली आहे .
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कोणालाही वाहतुक कोंडीत गाडी चालवायची आवड नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांचा टक्का घसरत आहे, हे केंद्र सरकाराच्याही लक्षात आलं आहे, म्हणून इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे, हे आपल्या भल्यासाठी होत आहे. तुम्हाला वाटतंय की मी टीकात्मक बोलतोय, पण तुम्ही सांगा, परवडलं नाही की लोकं सार्वजनिक वाहतुकीकडे लोकं वळतील, चांगल्या हेतुनं इंधन दरवाढ होत आहे हे आपण लक्षातच घेत नाहीये
दरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर आणि राज्यात चांगले रस्ते असण्याची आवश्यकता स्पष्ट केली. यामुळे राज्यात विकास वेगाने होईल अशी आशा व्यक्त केली. तसंच मुंबई महानगरमधील वाहनांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. एमएमआरडीएच्या या कार्यशाळेत मुंबई महानगरमधील भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीबाबत चर्चा होत दिशा निश्चित केली जाणार आहे.