महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे उघडकीस आली आहे .चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची हत्या केल्याचा आरोप तिच्या पतीवर ठेवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असून त्याचे नाव शुभम बारसे असल्याचे समजते. भुसावळ शहरातील न्यू पोर्टल चाळ भागात बुधवारी ही घटना उघडकीस आली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , मृत सुचिता खरे आणि तिचा पती शुभम बारसे यांचे शिक्षण शाळेत सोबत झाले होते आणि बारावीत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. सुचिताच्या वडिलांनी शुभमला त्यावेळी विवाहासाठी गळ घातली मात्र शिक्षण सुरु असल्याने त्याने नकार दिला आणि सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी तिचा विवाह दुसरीकडे लावून दिला.
सुचिताचे लग्न झाल्यावर दोन वर्षांनंतर एक मुलगा झाला मात्र ती पतीसोबत न राहता पुन्हा कायमची माहेरी निघून आली आणि तिने शुभमशी विवाह केला. विवाहानंतर दोघेही पोर्टल चाळीतील शुभमच्या घरी राहायला गेले. सुचिताला शुभमपासून दुसरा मुलगा झाला आणि त्यानंतर त्याच्यात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली.
शुभम याच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय निर्माण होऊ लागला. पहिल्या पतीच्या मुलाच्या सांभाळ करण्यावरून आरोपी शुभम व सुचिता यांच्यात भांडण होत असल्याचे वडिलांनी म्हटले आहे. शुभम हा सुचिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यानेच तिची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेचे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, संदीप दुनगहू, गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अवघ्या दोन तासात संशयित आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुचिता ही २८ तारखेलाच आपल्या सासरी गेली होती तर २९ तारखेला तिच्या मृत्यूची बातमी आली.