देशात आजकाल पैशासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नसून अशीच एक घटना कर्नाटकमधील बंगळुरु इथे उघडकीस आली आहे . सदर घटनेत अर्चना रेड्डी नामक महिलेची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. तपास सुरु असताना चक्क यात मृत महिलेचा पती आणि तिच्या मुलीचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता हा सर्व प्रकार 40 कोटी रुपयांच्या संपत्तीतुन झाल्याचे समोर आले आहे. 27 डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती. मयत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अर्चना रेड्डी यांची संपत्ती मिळवण्यासाठी बाप-लेकीने तिची हत्या करण्याचा कट रचला होता तसेच या प्रकरणात विवाहबाह्य संबंधाच्या संशयाचा देखील अँगल समोर आला आहे. मृत महिलेचा पती नवीन रेड्डी याने पाच सशस्त्र हल्लेखोरांसह पत्नीवर चाकूने वार करुन तिची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रत्यक्षदर्शी तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आहे .
आपला पती नवीन रेड्डी याच्या विवाहबाह्य संबंधाची पत्नी अर्चना रेड्डी यांना कुणकुण लागली होती तर अर्चना यांचेही विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय नवीनला होता. ह्याच कारणावरुन दोघांमध्ये वारंवार खटके उडत असत आणि त्याचे पर्यवसान अर्चना यांच्या मृत्यूत झाले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पती नवीन अर्चना रेड्डीवर वार करताना आढळून आला तर त्याच्या सोबत इतरही पाच जण आढळून आले होते.
डीसीपी श्रीनाथ एम जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा पती नवीन कुमार, त्याचा साथीदार संतोष आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर अटक केली आहे. नवीनची मुलगीही या प्रकरणात संशयित आहे. अर्चना रेड्डींची 40 कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी बापलेकीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.