महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी चिंचवड इथे उघडकीस आली आहे . विशेष म्हणजे एकदा ऑनलाईन फ्रॉड मध्ये फसून देखील सदर तरुणीने धडा घेतला नाही. तिला आधीही ९ लाख रुपयांना फटका बसला होता. जास्त करून उच्च शिक्षित, आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकताना दिसत असल्याने हा देखील एक चिंतेचा विषय झालेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारी एक उच्चशिक्षित तरुणी तब्बल दोनदा सायबर फ्रॉडमध्ये अडकली आहे. ऑनलाईन मित्राच्या नादात सदर तरुणी मर्यादा विसरली आणि त्यातून या ठगाने तरुणीस काही लाखांना चुना लावला. एकदा फसवणूक झाली तरी त्यातून काही बोध न घेता काहीजण परत जाळ्यात अडकत फसत असल्याचं समोर येत असल्याने अशा ऑनलाईन मैत्रीचा नाद तोडायचा तरी कसा ? हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे .
पीडित तरुणीची पहिली फसवणूक फेसबूक मैत्रीद्वारे झाली. सायबर गुन्हेगाराने मैत्री झाल्यानंतर पीडितेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगत कस्टममध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः आलोय आणि पोलिसांनी पकडलंय असं सांगत पैसे पाठवण्यास सांगण्यात आले त्यावेळी या महिलेला किमान 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला, मात्र तरीही ही तरुणी सावध झाली नाही आणि असाच काहीसा प्रकार दुसऱ्यांदा घडला.
याच तरुणीला दुसऱ्या एका सायबर गुन्हेगाराने कर्ज देण्याच्या नावाने फसवलं. आधी तुझा अनुभव खराब असेलही मात्र दुसर्यांदा असे होणार नाही म्हणत आर्थिक मदत करण्याच्या नादात आरोपीने कर्ज देतो सांगत या तरुणीला लाखो रुपयांनी गंडा घातला. विशेष म्हणजे सायबर गुन्हेरागाने कधी प्रोसेसिंग फी, डोकमेंटशन फी नावाने टप्प्याने पैसे उकळले ज्याची रक्कम देखील लाखोंच्या घरात आहे. सायबर सेलची देखील डोकेदुखी अशा प्रकरणांनी वाढत असून असे प्रकार नागरिकांच्याच सूज्ञपणाने थांबतील मात्र ठग देखील वेगवेगळे प्रकार अवलंबत असल्याने नागरिकांनीच जास्त सावधान राहण्याची गरज आहे .