‘ आईचे हाल पाहवत नाहीत ‘ पुण्यात दुहेरी आत्महत्येचा प्रकार उघडकीस

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली असून सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी परिसरात मध्यरात्री आई आणि लेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगीता दत्तात्रय खपाले (वय ४८) आणि रेवा दत्तात्रय खपाले (वय २४) अशी आत्महत्या करणाऱ्या मायलेकींची नावं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता खपाले गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे त्रस्त होत्या. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. संगीता या मुलगी रेवा आणि त्यांच्या मुलासोबत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे जेवण करून घरातील सगळे झोपले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता आई व बहिणीने गळफास घेतल्याचे त्याला दिसले.मुलाने स्वत:ला सावरत त्याने लगेचच खडकवासला येथील मोठ्या बहिणीला हा प्रकार कळवला आणि मोठी बहीण घटनास्थळी पोहोचली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असताना पोलिसांना घरात एक चिट्ठी आढळून आली. ‘आजारपणामुळे होणारे आईचे हाल पाहवत नाहीत, आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, पोलिसांनी घरच्यांना त्रास देऊ नये, असं चिठ्ठीत म्हटल्याचं पोलिसांकडून समजलं. दोघींचेही मृतदेह ससून रुग्णालयात पोलिसांनी शवविच्छेदनसाठी पाठवून दिले आहेत.


Spread the love