महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मुंबई इथे उघडकीस आली आहे. मुंबई येथील या घटनेत साडेतीन वर्षांच्या मुलाला छातीशी कवटाळत एका आईने उंच टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली आहे . श्रुती महाडिक (वय ३६) आणि राजवीर ( वय साडेतीन वर्षे ) अशी मयत मायलेकरांची नावे आहेत. त्यांचे दोघांचे मृतदेह आढळून आले असून चुलत दिरासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले असून चुनाभट्टी पोलिसांनी या दिराला ताब्यात घेतले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, श्रुती या कुर्ला येथील कामगार नगरमध्ये मुलगा राजवीर, पती यशराज, सासरे नंदादीप आणि चुलत दीर सचिन महाडिक आणि त्याच्या कुटुंबासह ड्युप्लेक्समध्ये राहत होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून पती यशराज याचे किराणा मालाचे दुकान आहे तर श्रुती ह्या घरीच असायच्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२२ रोजी श्रुती घरातून राजवीरला घेऊन निघून गेली. तिने जाताना एक सुसाईड नोट लिहिली. ज्यात चुलत दिराच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे तिने लिहिले. निघताना तिने तिची आई विद्या म्हात्रे यांना फोन करत मुलासह आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
तिच्या आईने महिलेचा पती यशराजला याबाबत कळविले आणि त्यांनी श्रुतीला फोन केला तिने फोन घरीच ठेवला होता. अखेर त्यांनी रात्री नेहरूनगर पोलिसांना सुसाईड नोट दाखवत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्याची नोंद करत तिला शोधण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा तपास केला असताना दोघांचेही मृतदेह चुनाभट्टी येथील नाल्यात सापडले.सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दीर सचिन महाडिक याला ताब्यात घेण्यात आले आहे .