महापालिका निवडणूक लढवता यावी म्हणून आधी विवाहित असलेल्या मात्र तीन अपत्य असलेल्या एका व्यक्तीने औरंगाबाद शहरात उमेदवार ‘ बायको पाहिजे ‘ असे फलक लावले होते. रविवारी या फलकांची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आता फलक लावणार या रमेश पाटील या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तांना या प्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
औरंगाबाद येथे आपल्याला तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही निवडणूक लढवण्यासाठी दुसरी पत्नी हवी अशा आशयाचे पोस्टर रविवारी औरंगाबाद शहरात लावण्यात आले होते त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आणि भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या पोस्टरला काळे फासले आणि आपला निषेध व्यक्त केला .
रमेश विनायकराव पाटील यांनी रविवारी सकाळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट यासारख्या ठिकाणी लावलेल्या पोस्टरची अवघ्या काही तासांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२ असे लिहिलेले असून, ‘ मला तीन अपत्य असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाही म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाही. वय 25 ते 40 असावे. अविवाहित विधवा घटस्फोटीत चालेल फक्त दोन अपत्येपेक्षा जास्त असणारी चालणार नाही ‘ असे देखील या पोस्टरवर लिहिलेले होते.
अवघ्या काही तासांमध्ये या पोस्टरची शहरभर चर्चा सुरू झाली आणि पोस्टर लावणारे रमेश पाटील हे देखील पैठण गेटवर आले आणि त्यांनी पोस्टर सोबत स्वतःचे फोटो देखील काढले. पाटील यांच्या म्हणण्यानुसार आपण मनसेचे कार्यकर्ते असून कोणत्याही पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तरी आपण निवडणूक लढायला तयार आहोत, असे म्हटले आहे.