.. अद्यापही ‘ तो ‘ ऊसतोड मजूर गायबच

Spread the love

जालना जिल्ह्यात एका व्यक्तीच्या अपहरणाची घटना घडलेली असून अद्याप देखील या युवकाला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ऊस तोडणीसाठी मजूर पाठवण्यासाठी आगाऊ घेतलेल्या पैशाच्या देवाणघेवाणीतून हा वाद झालेला असून परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथील 31 वर्षीय तरुणाचे आठवड्यापूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अद्यापपर्यंत अपहरणकर्ते आणि तरुण याचाही शोध लागलेला नाही.

उपलब्ध माहितीनुसार, केशव नामदेव कडपे ( वय ३१ ) असे अपहरण केलेल्या झालेल्या तरुणाचे नाव असून रायगव्हाण येथील नामदेव खंडोजी कडपे (वय ६१ ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, महबूब गुलाब भाई शेख ( तालुका माजलगाव ) व अन्य काही जण नोव्हेंबर महिन्यात आपल्याकडे ऊस तोडणीसाठी मजूर मिळतील काय ? याबाबत विचारणा करण्यासाठी आले होते. महेबुब शेख हे ओळखीचे असल्याने आपण त्यांची ऊसतोड मजुरांचे मुकादम असलेल्या विनोद मुरलीधर आडे ( राहणार परतवाडी तांडा ) यांच्यासोबत ओळख करून दिली.

महेबुब शेख आणि आणि विनोद आडे यांच्यात चोवीस ऊसतोड मजूर देण्याबाबत लेखी करार देखील झाला या करारावर साक्षीदार म्हणून आपल्यासह आष्टी येथील शेख बाबुभाई यांनीदेखील सही केली होती. ऊसतोड मजूर पुरवण्याचा बदल्यात महबूब शेख यांनी आडे यांना चोवीस लाख रुपये देखील दिले होते मात्र आडे यांनी फक्त सात मजूर पाठवले असे शेख मेहबूब यांनी आपल्याला सांगितले होते मात्र यानंतर महेबुब शेख आणि शेख बाबुभाई यांनी धमक्या देऊन मारहाण केली होती.

आष्टीचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे यांनी याबद्दल बोलताना म्हटले आहे की, ‘ आष्टी पोलिसांची दोन पथके आरोपीसह अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत असून अपहरणकर्त्यांनी केशव कडपे यास कर्नाटक राज्यातील एका साखर कारखान्यात डांबून ठेवल्याची माहिती हाती आल्यानंतर पोलिसांचे एक पथक कर्नाटक इथे गेलेले आहे लवकरच संशयित आरोपीचा शोध घेऊन अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली जाईल ‘, असे त्यांनी म्हटले आहे.


Spread the love