महाराष्ट्रात अनेक वेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात कुही इथे समोर आलेली असून शेतात हरभरा काढत असताना जमिनीत पुरून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट झाला आणि दोन महिला मजुरांश एक लहान मुलगा देखील जखमी झाला. कुही तालुक्यातील ससेगाव शिवारात बुधवारी ही घटना घडली असून पंचफुला जाधव ( वय 30 ) मनिषा वाघमोडे ( वय 25) व विक्रम सोनवणे ( वय 10 ) अशी जखमींची नावे आहेत.
करीना दिलीप सोनवणे ( राहणार ससेगाव ) हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ससेगाव येथील गोपाळ टोळीतील महिला बुधवारी कैलास ठक्कर यांच्या शेतात हरभरा काढण्यासाठी गेल्या होत्या. हरभरा काढत असताना शेतात असलेल्या गावठी बॉम्बला विळ्याचा धक्का लागल्याने बॉम्बचा स्फोट झाला त्यावेळी वरील तीन जण जखमी झाले.
स्फोटाचा आवाज ऐकून शेतमालक कैलास ठक्कर हे तिथे पोहोचले आणि त्यांनी या तिघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र या तिघांना पुढे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. चण्याच्या शेतात गावठी बॉम्ब कोणी ठेवला याचा अद्याप शोध लागलेला नाही मात्र जंगली रान डुक्कर मारण्याच्या उद्देशाने कुणीतरी हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.