महाराष्ट्रात अनेक घटना अशा काही उघडकीस येतात की परिसरात त्याची जोरदार चर्चा होते अशीच एक घटना बीड येथे समोर आलेली असून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले एक लिंबाचे झाड तोडून टाकण्यात आलेले आहे. झाड तोडणे ही बाब फारशी नवीन नसली तरी या झाडामागचा इतिहास पाहता या घटनेची पूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झालेली आहे.
लिंबाचे झाड हे आंदोलन करणाऱ्या व्यक्तींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. सतत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या झाडावर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले जायचे. झाडावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी विविध आश्वासने आणि गाजरे दाखवण्यात यायची. सदर प्रकरणी प्रशासनाची देखील चांगली तारांबळ उडत होती त्यामुळे अखेर हे झाडच तोडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलक व्यक्तींना इजा पोहोचू नये म्हणून अग्निशामक दलाला बोलावून त्यांची मनधरणी करण्यात प्रशासनाचा बराच वेळ खर्च होत होता. काही जणांनी या झाडाला तारेचे कुंपण लावा अशी देखील मागणी केली होती मात्र शिवाजीनगर ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर प्रशासनाने हे झाडच तोडून टाकलेले असून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे मात्र आंदोलकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून आपण हे केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.