राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाकडून बजावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश आहे.
कोणत्या संपत्तीच्या जप्तीची नोटीस ?
- एक साखर कारखाना (किंमत – जवळपास 600 कोटी रुपये)
- दक्षिण दिल्लीत एक फ्लॅट (किंमत – जवळपास 20 कोटी रुपये)
- मुंबईतील एक कार्यालय (किंमत – जवळपास 25 कोटी रुपये)
- गोव्यातील एक रिसॉर्ट (किंमत – जवळपास 250 कोटी रुपये)
- राज्यातील 27 वेगवेगळ्या ठिकाणची जमीन (किंमत – जवळपास 500 कोटी रुपये)
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे तर दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने रात्री उशीरा अटक केली आहे.