केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली अन अवघे पाचच रुपये कमी केले त्यामुळे आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय ? असा खडा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे .
संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल ? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल ? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का ? 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं. केंद्र सरकारने अत्यंत किरकोळ दरवाढ कमी केली आहे. ही एक प्रकारे नागरिकांची चेष्टाच असून या सरकारकडे मोठं मन नाही. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन ?. लोकं पेट्रोल पंपावर आता 15 रुपये आणि 20 रुपयाचं पेट्रोल घेत असतात. समोर मोदींचा फोटो असतो. मोदी त्यांना आशीर्वाद देतात. आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असं सांगत असतात, असा सवाल राऊत यांनी केला.
राज्यात कोणतंही संकट आलं तर केंद्राकडे नाही तर कुणाकडे बोट दाखवायचे? केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल ना. पेट्रोल-डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कुणाकडे बोट दाखवलं ? त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना ? भाजपचेच.. तुम्हीच मायबाप ना? देशाचे धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता ना? मग बोट कुणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं की बायडनकडे दाखवायचं? कुणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडे दाखवायचं? असा सवाल त्यांनी केला.