राज्यात भोंदू बाबांचे नवनवीन प्रताप रोज समोर येत असून अद्याप देखील लोक यांच्यावर विश्वास का ठेवतात ? ज्याचे एकच उत्तर आहे स्वतःचा विवेक गमावलेला असणे.जादूटोणा आणि काळी जादू याच्या नावाखाली अशाच पद्धतीने लोकांना गंडवणाऱ्या एका भोंदू बाबाला वसई पोलिसांनी अटक केली आहे . नूर -अली- सलमानी (वय ३२) असे या बाबाचे नाव असून याने आतापर्यंत अनेक महिलांची अशीच फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नूर -अली- सलमानी याने वसई, विरार, नालासोपारा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केली आहे. माझ्या अंगात काली माता येते, तुमच्या घरी कोण आजारी असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या मी सर्व दूर करून देणार, असे सांगत हा बाबा महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असे आणि त्यानंतर त्याचे फसवणुकीचे दुकान सुरु व्हायचे. अमक्या तमक्या पूजा करण्याच्या बहाण्याने हा पैसे उकळवत होता मात्र तो ज्या प्रकरणामुळे धरला गेला ते देखील अत्यंत रंजक आहे .
नूर -अली- सलमानी ने 18 त 22 ऑक्टोबर दरम्यान एका महिलेच्या घरी पूजा ठेवली. पूजा दरम्यान तुमच्या जवळ जेवढे सोनं असेल ते पूजा विधीमध्ये आणून एका कपड्यात बांधून पूजेला ठेवा असे सांगितले आणि या गाठोड्याला ७ दिवस कोणी हात लावायचा नाही असे त्याने सांगितले मात्र हातचलाखीने भोंदू बाबाने कपड्यात असलेले सोने बदलून त्यात दगड भरून ठेवले आणि सोने घेऊन तो पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि माणिकपूर पोलिसांनी सापळा रचून या भोंदूगिरी करणाऱ्या बाबाला बेड्या ठोकल्या.