एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या २० हून अधिक आमदारांसह गुजरातच्या सूरतमध्ये गेले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं मात्र, इतर वेळी आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्विट नेमकं का डिलीट केलं असावं यासंदर्भात तर्क वितर्क सुरु झाले आहेत. अमृता फडणवीस यांच्या ट्विटमधील था या शब्दाला अवतरण चिन्ह देण्यात आलेलं आहे. ‘था’ हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी वापरला असण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर केलेलं ट्विट माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर डिलीट करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. ते त्यांनी नंतर डिलीट केलं होतं अनेक वेळा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीकाही केलेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सोबतचं सरकार सोडून भाजप आणि शिवसेनेनं सरकार स्थापन करावं. मला मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार नको, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आता अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात ट्विट केल्यानं त्याचे राजकीय घडामोडींवर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे.