राजकीय नेत्यांचा दिवस आणि वेळ दौरे, सभा, बैठका अशा कार्यक्रमांनी बंदिस्त असतो. त्यांना मनोरंजन तसेच वैयक्तिक कामासाठी सहजासहजी वेळ भेटत नाही. कदाचित याच कारणामुळे नेतेमंडळी काही दिवसांसाठी अज्ञातवासात किंवा कुठेतरी दूर निघून जातात आणि आत्मचिंतन करतात. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील थोडं मनन आणि चिंतनाची गरज असून काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचं सांगितलं आहे तसेच काही निर्णयांचा फेरविचार देखील करणार असल्याचं सूचक विधान केल्यामुळे ‘ ते कोणते निर्णय ‘ याला सोशल मीडियात उधाण आले आहे .
काय आहे अमोल कोल्हे यांची पोस्ट ?
‘सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक थकवा आलाय.
शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने! टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही’