पुण्यात एक खळबळजनक अशी घटना कोंढवा येथे समोर आलेली होती. कोंढवा परिसरात मेहेअर एलेगांझा सोसायटीच्या समोर रिकाम्या प्लॉटमध्ये एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत महिलेची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नसून आरोपीचे नाव सईद आसिफ शेख ( वय 20 राहणार शिवनेरी नगर कोंढवा ) असे आहे. साई मंदिराजवळ एका रिकाम्या प्लॉटमध्ये बोराच्या झाडाखाली या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा देखील विद्रूप करण्यात आला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासाचे धागेदोरे जुळवत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यानंतर त्यांनी जो काही खुलासा केला ते ऐकून पोलिस देखील चकित झाले.
आरोपींनी म्हटल्याप्रमाणे , ‘ झाडीमध्ये बसून आम्ही दोघे बियर पीत होतो त्यावेळी ती महिला आमच्याजवळ आली आणि तिने आम्हाला दारू मागितली. आम्ही दारू देत नसल्याने तिने शिवीगाळ सुरू केली त्यानंतर आमच्यात वाद सुरू झाला आणि तिला धक्का दिल्याने ती खाली पडली आणि त्यानंतर आम्ही तिला मारून टाकले. तिचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही तिथून पळून गेलो, ‘ असे आरोपीने सांगितले असून कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोगले पुढील तपास करत आहेत