पोलिस दलात कार्यरत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यावर असलेला कामाचा दबाव हा काही लपून राहिलेला नाही. पूर्ण देशभरात पोलिस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा तणाव असून कुटुंबासाठी अनेकांना वेळ देखील देता येत नाही या पार्श्वभूमीवर एका पोलिस कॉन्स्टेबलने रजेचा लिहिलेला मजेदार अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्ज करणारे पोलीस कॉन्स्टेबल हे नेपाळच्या सीमेला लागून उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे कार्यरत असून त्यांनी वरिष्ठांना रजेच्या अर्जासाठी विनवणी करताना ‘ एक महिन्यापूर्वीच लग्न झालेले असून लगेच ड्युटीवर रुजू झाल्यामुळे पत्नी नाराज आहे. तिला फोन केला असता ती माझ्याशी न बोलता आईकडे मोबाईल देते. तिची समजूत काढण्यासाठी आपल्याला रजा मंजूर करावी असे म्हटलेले आहे. महाराजगंज जिल्ह्यातील नव्हतवा पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल यांनी हा अर्ज लिहिलेला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल यांनी या अर्जात पुढे, ‘ मी माझ्या पुतण्याच्या वाढदिवसाला नक्की घरी येईल असे वचन मी माझ्या पत्नीला दिलेले आहे त्यामुळे मला कृपया 10 जानेवारीपासून तर सात दिवसांची कॅज्युअल सुट्टी मंजूर करण्यात यावी मी तुमचा ऋणी राहील ‘ असे म्हटलेले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी अखेर या व्यक्तीची रजा मंजूर केली असून 10 जानेवारीपासून रजा सुरू झालेली आहे.