काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे एका कारमध्ये एक मृतदेह आढळून आलेला होता. सदर मृतदेह हा एका माजी सैनिकाचा असून त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झालेले होते मात्र गुन्ह्यामागचे कारण आणि आरोपी यांच्यापर्यंत पोलिस अद्यापपर्यंत पोहोचले नव्हते मात्र अखेर या प्रकरणाचा संपूर्णपणे उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. डीएनए टेस्टिंगद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार, सदर मृतदेह हा संदीप पुंजाराम गुंजाळ या माजी सैनिकाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते इगतपुरी येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. 30 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते समृद्धी महामार्ग येथून त्यांची कार घेऊन गेले आणि सकाळी साडेआठच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलिसांपुढे देखील आव्हान बनलेला होता मात्र पोलिसांनी अखेर प्रकरणाचा संपूर्णपणे उलगडा केलेला असून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे.
संदीप गुंजाळ हे कार घेऊन भावली धरण परिसराकडे गाडी चालवत असताना नांदगाव येथे दुचाकीवरील दोन इसमानी त्यांना कट मारला आणि त्यावरून त्यांचे भांडण झाले. आरोपी आकाश चंद्रकांत भोईर आणि एक विधी संघर्षित युवक ( दोघेही नांदगाव तालुका इगतपुरी ) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गाडीला कट मारल्यावर आम्ही त्यांना शिवीगाळ केली त्यानंतर त्यांनी देखील आम्हाला शिवीगाळ केली म्हणून आम्ही चॉपरने त्यांच्या पोटावर वार केले आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गाडीत मृतदेह टाकून गाडी पेटवून दिली असे सांगितलेले आहे.