शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले जाते, हे काही खोटे नाही .असाच एक निकाल नागपूर इथे समोर आला असून सदर प्रकरणाच्या निकालाला चक्क 42 वर्षे लागली आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे सदर खटला हा फक्त चाळीस रुपयांच्या लुटीचा होता. दरम्यान चार पैकी तीन आरोपी आणि सात पैकी चार सरकारी साक्षीदारांचा देखील निकालापूर्वीच मृत्यू झाला आणि आणि बचावलेल्या एका आरोपीला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष सोडून देण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, भीमराव राजाराम नितनवरे असे बचावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे वय सध्या 65 वर्ष झाले असून आत्तापर्यंत आरोपी जामिनावर बाहेर होता तर इतर आरोपींमध्ये रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके यांचा समावेश होता.
सदर घटना ही 1978 साली हिंगणा रोडवर घडली होती त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी रमेश मेश्राम याला अटक करण्यात यश मिळवले मात्र इतर आरोपी फरार झाले . दरम्यानच्या काळात पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काही वर्षांनंतर फरार आरोपी मधुकर पाटील व हिरामण ढोके यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर भीमराव नितनवरे पोलिसांच्या ताब्यात आला मात्र त्यानंतर रमेश मेश्राम हा देखील मरण पावला अशा अनेक कारणांनी हे प्रकरण लांबत गेले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कार्यालयाने नितनवरे विरुद्ध खटला चालवण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. सत्र न्यायालयाने अनेक वर्षांनी हा खटला निकाली काढला.
घटना नेमकी काय होती ?
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी मोतीराम गेडाम हे घटनेच्या दिवशी रात्री बाराच्या सुमारास घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले तसेच त्यांना चाकूने जखमी करून त्यांच्याकडून चाळीस रुपये हिसकावून घेतले आणि त्यानंतर आरोपी पळून गेले, अशी तक्रार होती. उशिरा मिळालेला न्याय याला न्याय म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले असून देखील न्यायालयीन प्रक्रियेत होणारा विलंब हा नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.