फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या महाराष्ट्रात समोर आलेला असून मुंबईतील अंधेरी इथे तैवान वरून तुमचे एक पार्सल आलेले आहे त्यामध्ये ड्रग्स आहे आणि आपण सायबर पोलीस बोलत आहोत असे सांगत तपासासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती द्या असे सांगून तरुणीच्या बँक खात्यातून सुमारे तीन लाख 26 हजार रुपये लंपास करण्यात आलेले आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीला यामुळे मोठा धक्का बसलेला असून जळगाव जिल्ह्यातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
जळगाव शहरातील एक बत्तीस वर्षीय तरुणी पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. 8 सप्टेंबर रोजी तिला एका कुरियर कंपनीमधून अनोळखी व्यक्तीचा फोन आलेला होता त्यावेळी त्याने अंधेरी मुंबई इथे तुमचे एक पार्सल आलेले आहे त्यामध्ये तुमचे कपडे , क्रेडिट कार्ड आणि पासपोर्टसोबतच काही ड्रग्स आहेत अशी माहिती त्याने दिली. तरुणीने त्यानंतर असे काहीही पार्सल माझे आलेले नाही असे सांगितले त्यावेळी समोरील व्यक्तीने मी तुमचा कॉल सायबर क्राईमला फॉरवर्ड करतो असे सांगत हा कॉल फॉरवर्ड करण्यात आला.
आरोपीने त्यानंतर आपले नाव संजय कुमार असून आपण सायबर क्राईममधून बोलत आहे असे सांगितले आणि तुम्ही तुमचे आधार कार्ड किंवा इतर माहिती कुणासोबत शेअर केलेली आहे का ? असे विचारले त्यानंतर तुमच्या कागदपत्रांचा देखील गैरवापर झालेला आहे असे सांगत चौकशीसाठी म्हणून तुमच्या खात्यात आमची प्रोसेस फॉलो करण्यास तिला सांगण्यात आले आणि त्यानंतर तिच्या बँक खात्याची पूर्ण माहिती घेऊन त्यातून सुमारे तीन लाख 26 हजार रुपये गायब करण्यात आले. जिल्हा पेठ पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.