शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून जास्त कमिशनचे आमिष दाखवून 35 लाख रुपयांना लुटणाऱ्या एका भामट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून बेड्या ठोकलेल्या आहेत. आरोपीने एका तरुणाला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवले आणि बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले होते त्यातून हा फसवणुकीचा प्रकार घडला.
उपलब्ध माहितीनुसार , तुषार प्रकाश अजवानी ( वय 37 राहणार वॉटर फोर्ड जुहू लेन अंधेरी पश्चिम ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने तक्रारदार व्यक्ती यांना गुगलवर एका कंपनीला तुम्ही रिव्ह्यू दिले तर त्याचे कमिशन तुम्हाला प्रत्येक डीलमध्ये मिळेल असे सांगितले होते. काही किरकोळ रक्कम देऊन आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि पुढील कामासाठी डिपॉझिट म्हणून आत्तापर्यंत तब्बल 35 लाख रुपयांना तक्रारदार व्यक्ती यांना फसवले.
आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्यांनी सायबर पोलिसात या प्रकरणी फिर्याद नोंदवली त्यानंतर सायबर पोलिसांनी ज्या खात्यात बँक पैसे वर्ग करण्यात आले ते खातेसोबतच आरोपीचा तांत्रिक तपास केला त्यावेळी आरोपी मुंबईतील जुहू येथे असल्याची माहिती समजली आणि तात्काळ पोलिसांनी तुषार याला तिथे जाऊन अटक केली. अनेकदा आवाहन करून देखील कमी कष्टात जास्त पैसे या आमिषाला नागरिक बळी पडत असल्याचे आतापर्यंतच्या अनेक घटनांमध्ये समोर आलेले आहे.