पुण्यातील एका तरुणाचा खंबाटकी बोगद्यानंतर असलेल्या वळणाजवळील नाल्यात अखेर मृतदेह आढळून आलेला असून 17 तारखेला हा तरुण बावधन येथील त्याच्या घरातून निघून गेलेला होता. ध्रुव स्वप्निल सोनवणे ( वय 18 वर्षे राहणार बावधन पुणे ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ध्रुव सोनवणे हा दुचाकीवर बसून घरातून निघून गेलेला होता त्यानंतर तो नाल्यामध्ये पडला मात्र झाडी आणि गवतामुळे कुणाच्याच हा प्रकार लक्षात आला नाही. रस्त्यालगतची झुडपे काढत असताना त्याची दुचाकी तिथे दिसून आली आणि त्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे.
ध्रुव याचे आई-वडील आणि आजी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे त्यांच्या मूळ गावी गेलेले असताना बावधन येथील घरी तो एकटाच होता. सकाळी ध्रुव याच्या आत्याने चौकशी केली त्यावेळी तो घरी नसल्याचे लक्षात आले. तो घरी परतला नाही म्हणून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यावेळी तो रात्री एकच्या सुमारास घर सोडून निघून गेलेला होता. हिंजवडी पोलिसात त्यानंतर तक्रारही देण्यात आली होती आणि पोलिसांनी तपासाला देखील सुरुवात केली होती.
ध्रुव याचे लोकेशन दिवसभर रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा वाई असे दिसत होते मात्र संध्याकाळनंतर त्याचे लोकेशन देखील गायब झाले. ध्रुव याचे आई-वडील आणि नातेवाईक यांनी पाच दिवसांपासून कसून शोध घेतला मात्र दुर्दैवाने अखेर त्याचा मृतदेहच आढळून आलेला आहे. खंडाळा पोलिसात या प्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे.