जामीनपात्र गुन्हा असताना देखील एका संगीत शिक्षकाला ताब्यात घेणे मुंबई पोलिसांना चांगलेच भोवलेले असून पोलिसांची कारवाई त्यांच्यातील उदासीनता आणि असंवेदनशीलता दाखवते असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवलेले आहे सोबतच या शिक्षकाला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , जुलै महिन्यामध्ये ताडदेव पोलिसांनी नीलम संपत यांचे पती नितीन संपत यांना अटक केली होती. नितीन हे संगीत शिक्षक असून शिक्षणाची फी वाढवल्याबद्दल वाढवली म्हणून एका महिलेने त्यांच्याकडे विचारणा केली आणि त्यानंतर या महिलेने आपला लैंगिक छळ झाला असल्याची तक्रार ताडदेव पोलिसात केलेली होती त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या वकिलांनी संबंधित गुन्हा जामीन पात्र असून जामीन भरण्याची देखील तयारी दाखवली मात्र पोलिसांनी जामिनावर सुटका करण्यास नकार दिला सोबतच लॉकअपमध्ये त्यांना कपडे उतरवण्यास सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिले.
सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने नीलम संपत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिलेला असून घटनेअंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचे पोलिसांनी उल्लंघन केलेले आहे शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे देखील त्यांनी उल्लंघन केलेले आहे असे निरीक्षण नोंदवले. पोलिसांनी देखील त्यानंतर माफी मागितली आणि न्यायालयाने राज्य सरकारने या दंडाची भरपाई करावी असे म्हणत सहा आठवड्यांच्या आत नितीन यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आदेश दिलेले आहेत.