महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेली असून एका मॅट्रिमोनियल साईटवर ठेवलेल्या प्रोफाईलवर विश्वास ठेवला आणि त्याचा एका महिलेला तब्बल 11 लाख रुपयांना फटका बसलेला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आर्यन मुकुंद देशपांडे उर्फ पंकज मुकुंद महाजन ( राहणार मयुरेश भवन चंदननगर अमरावती ) असे या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपीचे नाव असून तक्रारदार महिला एका राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत आहेत. त्यांचे वय 36 वर्ष असून ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झालेले होते . त्यांना एक सहा वर्षांची मुलगी असून सध्या त्या मुंबईला राहतात.
त्यांच्या बहिणीने त्यांचे नाव एका मॅट्रिमोनियल साइटवर नोंदवलेले होते आणि डिसेंबर 2022 मध्ये आर्यन देशपांडे नावाच्या प्रोफाईलवरून त्यांना मेसेज आला त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत असे सांगितले होते. महिलेने त्याला त्यांचा भूतकाळ आणि मुलीविषयी देखील माहिती दिली त्यावेळी पंकज याने त्यांना स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि त्यानुसार प्रत्यक्ष भेटीची तयारी दाखवली.
फेब्रुवारी 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर इथे दोघे भेटले त्यावेळी त्याने आपला मोबाईल हरवला आहे तात्पुरता मला दुसरा मोबाईल घेऊन दे अशी विनंती केली म्हणून महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला तीस हजार रुपयांचा मोबाईलदेखील घेऊन दिला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्यानंतर बांधकाम व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला पैसे कमी पडत आहेत म्हणून पाच लाख रुपये आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून सहा लाख रुपये घेतले आणि त्यानंतर अचानकपणे लग्नाला नकार दिला आणि संपर्क देखील बंद करून टाकला.
त्याच्यासोबत वेळोवेळी संपर्क करण्याचा महिलेने प्रयत्न केला मात्र अखेर त्याचा फोन स्विच ऑफ येत असल्याकारणाने तसेच इतरही त्याची खूप काही माहिती महिलेकडे नसल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक राजश्री आडे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.